!! PANI/ NEER/JAL CHI MAHIMA !!

 खालील कवितेत २६ वेळा पाणी शब्द आला आहे व वैशिष्ट्य असे, की प्रत्येक वेळी पाणी या शब्दाचे विविध अर्थ उलगडतात..!

ही आहे मराठी भाषेची श्रीमंती..!

'पाणी' शब्द हा असे प्रवाही, वळवू तिकडे वळतो हा.. जशी भावना मनात असते, रूप बदलते कसे पहा   ..!

           *रंग पाण्याचे*❤️

नयनामध्ये येता  'पाणी'

अश्रू तयाला म्हणती,

कधी सुखाचे, कधी दुःखाचे,

अशी तयांची महती..!

      चटकदार तो पदार्थ दिसता,

      तोंडाला या 'पाणी' सुटते,

      खाता खाता ठसका लागून

      डोळ्यांतून मग 'पाणी' येते..!

धनाढ्याघरी लक्ष्मी देवी,

म्हणती अविरत भरते  'पाणी'..

ताकदीहूनी वित्त खर्चिता

डोक्यावरूनी जाते  'पाणी' ..!

    "वळणाचे 'पाणी' वळणावरती"

     म्हण मराठी एक असे,

     "बारा गांवचे 'पाणी' प्यालाय"

     चतुराई यातुनी दिसे..!

लाथ मारूनी 'पाणी' काढणे, 

लक्षण हे तर कर्तृत्वाचे,

मेहनतीवर 'पाणी' पडणे

चीज न होणे कष्टाचे..!

     उत्कर्ष दुज्याचा मनी डाचतो,

     'पाण्या'त पाहणे गुण खोटा..   

     'पाणी'दार ते नेत्र सांगती,

     विद्वत्तेचा गुण मोठा..!

शिवरायांनी कितीक वेळा,

शत्रूला त्या 'पाणी' पाजले..

नामोहरम करून, अपुले

मराठमोळे 'पाणी'दाविले..!

     टपोर मोती दवबिंदूचे

     चमचम 'पाणी' पानावरती,

     क्षणैक सुखाची प्राप्ती म्हणजे,

     अळवावरचे अलगद 'पाणी'..!

कळी कोवळी कुणी कुस्करी,

काळजाचे त्या 'पाणी' होते..

ओंजळीतूनी 'पाणी' सुटता,

कन्यादानाचे पुण्य लाभते..!

     मायबाप हे आम्हां घडविती,

     रक्ताचे ते 'पाणी' करूनी..

     विनम्र होऊन त्यांच्या ठायी

     नकळत दोन्ही जुळती 'पाणि'

आभाळातून पडता 'पाणी'

तुडुंब, दुथडी नद्या वाहती,

दुष्काळाचे सावट पडतां

सारे 'पाणी पाणी' करती..!

      अंतीम समयी मुखात 'पाणी'

      वेळ जाणवे निघण्याची..

      पितरांना मग 'पाणी' देऊनी,

      स्मृती जागते आप्तांची..!

मनामनांतील भावनांचे,

'पाण्या' मध्ये मिसळा रंग..

प्रतिबिंबीत हे होते जेव्हा,

चेहऱ्यावरती उठे तरंग..!!

🙏🙏 (कवि अज्ञात)

Comments

Popular posts from this blog

TIME IS THE MOST PRESTIGIOUS AND PRECIOUS OF YOUR LIFE

RAM RAM aaur RAM

, BHARTIYA RAIL